नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन या येत्या 8 जून पासून जपान मध्ये सुरू होणाऱ्या जी 20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद दोन दिवस चालणार असून अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा पहिलाच विदेश दौरा असेल. ही परिषद जपान मधील फुकुओका येथे होत आहे. भारताच्या रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हेही या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या परिषेदत जागतिक अर्थव्यवस्थे पुढे निर्माण झालेली आव्हाने, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय कर इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे. सन 2019 या वर्षात संपुर्ण देशाचा जीडीपी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने त्या विषयाचीही या परिषदेत चर्चा होणे अपेक्षित आहे. हा जीडीपी 3.6 वरून आता 3.3 टक्के इतका होण्याची अपेक्षा आहे. जागतिक आर्थिक स्थितीचा विचार करण्यासाठी सन 1999 पासून दर वर्षी जी 20 देशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक होत असते. या गटात अमेरिका, ब्रिटन, रशिया, सौदी अरेबिया, चीन, फ्रांस, ऑस्ट्रेलिया अशा देशांचा समावेश आहे.