वाहन उद्योगातील मंदीला ओला-उबेर कारणीभूत – सीतारामन

नवी दिल्ली- ओला आणि उबेर प्रवाशी वाहतूक कंपन्यांमुळे वाहन उद्योग क्षेत्राला फटका बसला आहे, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

वाहन उद्योग क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीबद्दल निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील वाहन उद्योगावर बीएस-6 बरोबरच ओला-उबर कंपन्यांच्या वाहनांचा वाढत्या वापराचा परिणाम झाला आहे. नवी वाहने खरेदी करण्यापेक्षा लोक ओला-उबरच्या वाहनाचा वापर करण्यावर भर देत आहेत.

वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने इंधनासाठी भारत स्टेज 6 (बीएस 6) मानके 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा देखील वाहन खरेदीवर परिणाम झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मागील आठवड्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उद्योग क्षेत्रासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले होते. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहनांवर सरकार कोणतीही बंदी घालणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या क्षेत्रातील उद्योगांना दिलासा दिला होता.

सरकार वाहन उद्योग क्षेत्रामधील मंदीबाबतही गंभीर असल्याचे सांगत, ऑटो कंपोनंट इंडस्ट्रीच्या मागण्यांबाबतही विचार केला जात असल्याचे त्यांना सांगितले. शिवाय घर खरेदी करणाऱ्यांच्या मागण्यांवर देखील सरकार उपाय शोधत आहेत असे त्या यावेळी म्हणाल्या. आर्थिक मंदीमुळे देशातील वाहन उद्योग संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची विक्री घटत चालली असून, वाहन कंपन्यांकडून रोजगार कपात केली जात आहे.

भारतीय अर्थव्यवस्था मंदी फेऱ्यात अडकत चालली असून, देशाचा जीडीपी (विकास दर) पाच टक्क्‌यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या आर्थिक संकटावरून काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारवर टीका केली होती. सरकारच्या चुकीमुळे अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे.

सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाली आहे, अशी टीका करत यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सिंग यांनी केले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×