मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर
नवी दिल्ली- दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकार मधील मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले असून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाचा तर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्याकडे त्यांचे पुर्वीचेच राष्ट्रीय महामार्ग, परिवहन खाते देण्यात आले असून त्याखेरीज त्यांच्याकडे कुटीर, लघु, आणि मध्यम उद्योग मंत्रीपदाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर यांच्याकडील खातेही बदलण्यात आले असून ते आता माहिती आणि प्रसारण खात्याचा कार्यभार पहातील. त्या खेरीज त्यांच्याकडे वने, पर्यावरण या मंत्रालयाचाही कार्यभार राहील.महाराष्ट्रातील शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. स्मृती इराणी यांना महिला व बालकल्याण खाते देण्यात आले असून पुर्वीचे वस्त्रोद्योग खातेही त्यांच्याकडेच राहणार आहे.
आजच्या खातेवाटपाविषयी देशभर बरीच उत्सुकता होती. अमित शहा यांना अर्थखात्याचा कारभार दिला जाणार असल्याची चर्चा होती. पण त्याची विपरीत प्रतिक्रीया उमटू लागल्याने त्यांना गृहमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आल्याची चर्चा दिल्लीत रंगली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वताकडे प्रशिक्षण व कार्मिक विभाग, अणु उर्जा, अंतरीक्ष संशोधन ही खाती ठेवली असून वाटप न झालेली खातीही त्यांच्याकडेच राहणार आहेत. अर्थमंत्रीपदाचा कार्यभार ज्यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्या पीयुष गोयल यांच्याकडे पुर्वीचाच रेल्वमंत्रीपदाचा कार्यभार राहणार आहे. त्याखेरीज त्यांच्याकडे वाणिज्य खात्याचाही कार्यभार देण्यात आला आहे. गोयल यांच्याकडील कोळसा खात्याचा कार्यभार काढून तो प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. जोशी यांच्याकडे संसदीय कामकाज आणि खनिकर्म खातेही देण्यात आले आहे. रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान यांच्याकडे सध्या असलेलीच खाती कायम राहणार आहेत.
जलशक्ती हे नवीन खाते सुरू करण्यात आले असून त्याचा कार्यभार गजेंद्रसिंह शेखावत यांना देण्यात आला आहे. रविशंकर प्रसाद हे विधी व न्याय तसेच माहिती तंत्रज्ञान ही खाती पहातील. पेट्रोलियम मंत्रालय धर्मेंद्र प्रधान यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे मनुष्यबळ विकास हे महत्वाचे खाते देण्यात आले आहे. नरेंद्रसिंह तोमर हे कृषी खात्याचे मंत्री म्हणून काम पहाणार असून त्यांच्याकडेच ग्रामविकास आणि पंचायत राज ही अन्य खाती देण्यात आली आहेत. डी व्ही सदानंद गोैडा यांच्याकडे खते आणि रसायने खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. अकालीदलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या मंत्री म्हणून काम पहातील तर थावरचंद गेहलोत यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याचा कारभार राहील.
उत्तरप्रदेशातून आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले संतोषकुमार गंगवार यांच्याकडे कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा कारभार स्वतंत्रपणे सोपवण्यात आला आहे. ते राज्यमंत्री आहेत. राज्यंमत्री म्हणून स्वतंत्र कारभार सोपवण्यात आलेल्या अन्य मंत्र्यांपैकी हरदीप पुरी यांच्याकडे नागरी विमान वाहतूक आणि आर. के. सिंह यांच्याकडे उर्जा आणि अपरांपारीक उर्जा ही खाती सोपवण्यात आली आहेत.