106 शिक्षकांच्या नियमबाह्य वैयक्तिक मान्यता प्रकरणी चौकशी सुरू
पुणे – पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील 106 शिक्षकांना नियमबाह्य वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी अखेर चौकशी समितीला मुहूर्त मिळाला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी कडक शद्बात समज दिल्यामुळे चौकशी समितीला चौकशी करण्यासाठी जाग आल्याची बाब उघड झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार करून नियम डावलून सर्रासपणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मान्यता देण्याचा धडाका लावला होता. प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीचे महासचिव आदिनाथ माळवे यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांच्या कालावधीतील वैयक्तिक मान्यतांप्रकरणी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे तक्रार केली होती. शिक्षण आयुक्तांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांना सखोल चौकशी करून प्राथमिक अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्राय व आवश्यक पुराव्यासह सादर करण्याचे आदेश बजाविले होते.
पाटील यांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना त्रिसदस्यीय समिती नेमूण अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश 22 जुलै रोजी जारी केले होते. आदेशाचे पालन न झाल्याने पुन्हा 22 ऑगस्ट रोजी स्मरणपत्र पाठविले होते. प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रविण अहिरे, शिक्षण उपनिरीक्षक धनाजी बुट्टे, पुणे महापालिकेतील माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक माळी यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे.
चौकशी कशी करायची याबाबत समितीची आतापर्यंत दोनवेळा बैठक झाली आहे. संबंधित तक्रारदाराकडून काही पुरावे मिळविण्याचा प्रयत्नही होत आहे.
चौकशी करण्याचे आदेश बजावून 6 महिने होत असताना अद्यापही अहवाल सादर न झाल्याने दिनकर पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. 8 दिवसांत अहवाल सादर करा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली असून चौकशीस सुरुवात केली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या यादीनुसार सर्व फायली ताब्यात घेऊन त्यांची कसून तपासणी होणार आहे. शासनाचे निर्णय, नियम याप्रमाणे मान्यता दिल्या आहेत की नाहीत याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यावर अहवाल तयार करून तो शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात येणार आहे.
– प्रविण अहिरे, शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग