सादरीकरणानंतर स्थायीत मंजूर : पूर्णानगरमधील नियोजित पर्यटनस्थळ
पिंपरी – अखेर सत्तारुढ पक्षनेत्यांच्या प्रभागातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग स्थायीतून मोकळा झाला आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या प्रभागातील पर्यटनस्थळ विकसित करण्याचा सुमारे 15 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रस्ताव स्थायीत मागील साप्ताहिक बैठकीत तहकूब करण्यात आला होता. या प्रकल्पाचे स्थायी समिती बैठकीत सादरीकरण झाल्यानंतर, त्याला स्थायीने मान्यता दिली आहे. बुधवारी (दि.24) पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते.
प्रभाग क्र. 11 मधील पूर्णानगर येथील सीडीसीमधील मोकळ्या जागेवर पर्यटन स्थळ विकसित करण्याबाबत 16 कोटी, 3 लाख, 21 हजार, 309 रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. स्थायीच्या बैठकीत आलेले बहुतेक प्रस्ताव भाजप संख्याबळाच्या जोरावर मंजूर करुन घेण्याची परंपरा सुरू असताना सत्तारुढ पक्षनेत्याचाच प्रस्ताव गत बैठकीत तहकूब करण्यात आल्याने पालिकेमध्ये चर्चेला उधाण आले होते. या प्रस्तावाला राष्ट्रवादीचे मयूर कलाटे, पंकज भालेकर यांनी विरोध दर्शविला होता. या सर्व बाबी लक्षात घेत, या प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर अखेर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.