नवी दिल्ली – जगाला वेठीस धरणाऱ्या करोना संकटावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच एका आनंदवार्ता समोर आली आहे.ब्रिटनने फायझर बायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी कोणता निर्णय घेण्याच्या अगोदरच लसीला मंजुरी देणारा ब्रिटन जगातला पहिला देश ठरला असून या देशात पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे.
UK authorises Pfizer-BioNTech COVID-19 vaccine, to be made available across the country from next week pic.twitter.com/gHVXZ98cLD
— ANI (@ANI) December 2, 2020
कोविड-19च्या प्रतिबंधासाठी फायझर अणि बायोएनटेक या जागतिक पातळीवरील औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची परिणामकारकता 95 टक्के असल्याचे दिसून आले आहे. ‘बीएनटी162बी2’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला होता. या चाचणीमध्ये प्राथमिक अपेक्षित परिणाम साध्य होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांनी या वर्षभरात जगभरासाठी लसीचे 5 कोटी डोसचे तर 2021 च्या अखेरीपर्यंत 1.3 अब्ज डोसचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
दरम्यान, अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीनेही विकसित केलेली करोना विरोधी लस 94.5 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे.