मुंबई : कर्तव्यावर असताना ‘इन्स्टाग्राम’वर रील बनवत असल्याने एसटी महामंडळाने महिला कंडक्टर मंगल गिरी यांचे निलंबन केले होते. मात्र महानंदलावर होत असलेल्या टीकेनंतर अखेर निलंबन मागे घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगल गिरी यांच्या वरील निलंबनाच्या कारवाई नंतर अनेकांनी या कारवाईविरोधात आवाज उठवला होता. तसेच निलंबन मागे घेण्याचीही मागणी केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांचा समावेश होता. या मागणीची दखल घेत त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात आली आहे.
एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या मंगल गिरी यांच्यावर महामंडळाने कारवाईचा बडगा उचलला होता. इतकंच नाही तर त्यांचे व्हिडीओ शूट करणाऱ्या वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार यांनाही निलंबित कऱण्यात आले होते. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप मंगलवर करण्यात आला होता.
गणवेशात रिल्स केल्याचा आक्षेप असेल तर ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊन ही चूक सुधारण्याची संधी देता आली असती. पण त्याऐवजी थेट निलंबनाची कारवाई हा घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो. यात योग्य ती दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला द्याव्यात, ही विनंती!@mieknathshinde
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2022
मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर रोहित पवार यांनी ट्वीट केले होते. “अनेक ताणतणाव असूनही दररोज लाखो प्रवाशांना विनाअपघात सेवा देणारे एसटीचे कर्मचारी हे खरे हिरो आहेत. त्यातील एखादी मंगल पुरी ही भगिनी इन्स्टा स्टार होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण त्याऐवजी तिला तडकाफडकी निलंबित करणं चुकीचं वाटतं,” असे ट्वीट रोहित पवार यांनी केले होते.
अनेक ताणतणाव असूनही दररोज लाखो प्रवाशांना विनाअपघात सेवा देणारे #ST चे कर्मचारी हे खरे हिरो आहेत. त्यातील एखादी मंगल पुरी ही भगिनी #InstaStar होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण त्याऐवजी तिला तडकाफडकी निलंबित करणं चुकीचं वाटतं. pic.twitter.com/9HPPfttksC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2022
“माझ्यासह इतर अनेकांनी केलेल्या मागणीची दखल घेत अखेर इन्स्टा स्टार मंगल गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन रद्द करण्यात आलं. याबद्दल सरकारचे आभार! भविष्यात गिरीताई याही एसटीच्या गणवेशाचा, आणि एसटीचा सन्मान राखतील अशी अपेक्षा,” असल्याचेही रोहित पवार म्हणाले आहेत.