नवी दिल्ली – रिचा चढ्ढा आणि अली फजल हे यावर्षी एप्रिलमध्ये लग्न करणे अपेक्षित होते. मात्र, कोविड-19 च्या पहिल्या लाटेमुळे त्यांची ही योजना पूर्ण बारगळली. हे दोघे पुढच्या वर्षी मार्चमध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळते आहे.
हे लग्न या दोघांना अगदी धुमधडाक्यात करायचे आहे. म्हणून त्यांनी परफेक्ट वेडिंग डेस्टिनेशनचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. विवाहसोहळा मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये सारख्याच धुमधडाक्यात होणार आहे.
असे या दोघांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले. यातील प्रत्यक्ष लग्नाला केवळ घरातील नातेवाईक असतील तर स्वागत समारंभाला मित्रमंडळी आणि एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीतील सहकारी असतील.
दोन्ही शहरांमधील चांगल्या ठिकाणांचा शोध आता घेतला जातो आहे. लवकरच त्यांच्या समोरच्या पर्यायांपैकी ठिकाण निश्चित केले जाईल. रिचा चढ्ढा आणि अली फजल या दोघांना एप्रिल महिन्यापासून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे.
म्हणूनच मार्चमध्ये लग्न उरकायचे आहे. अली फजलला एका हॉलीवूडच्या प्रोजेक्टवरही काम करायचे आहे. अली आणि रिचाने सुरू केलेल्या प्रॉडक्शन कंपनीचा पहिला सिनेमा “गर्ल्स विल बी गर्ल्स’ असणार आहे.