पिंपरी – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते आज (सोमवारी) एकत्र आले. आतापर्यंत वेगवेगळ्या दिशेला असलेल्या या पक्षांकडून शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी ताकद लावली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. या तीनही पक्षांनी विधानपरिषदेची होऊ घातलेली निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवित आहेत.
मतदान अवघ्या आठवडाभरावर आल्यानंतरही शहर पातळीर या तीनही पक्षांची एकत्रित प्रचार यंत्रणा सुरू झालेली नव्हती. राष्ट्रवादीच्या पातळीवर काही प्रमाणात प्रचार सुरू असला तरी तो देखील अपेक्षित ताकदीने सुरू नव्हता. अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी शहर पातळीवर गेल्या आठवडाभरापासून प्रयत्न करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणण्यात यश मिळविले आहे.
आज (रविवारी) महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत त्यांनी प्रचारासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे व कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते. सुमारे अर्धा तासाच्या या बैठकीत विधानपरिषदेचे उमेदवार विजयी करण्यावर तसेच अधिकाधिक मतदान घडवून आणण्यावर चर्चा करण्यात आली.