अखेर भाजपचा करंटेपणा संकटकाळात उघड

नगर -करोना विषाणूच्या संसर्गाने अवघे जग संकटात आहे. त्याला तोंड देण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, संस्था, राज्य आणि देश आटोकाट प्रयत्न करीत आहे. प्रगत देशांनी करोना महामारीपुढे हात टेकलेत. अशाही बिकट परिस्थितीत राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या भाजपने काळे झेंडे दाखवून त्यांचा करंटेपणा उघड केला आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध करत असल्याची भूमिका शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी व्यक्त केली.

या संदर्भात भोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाजप नेतृत्वावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अक्षरश: प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली गजबजलेली, दाट लोकसंख्येची, दाट लोकवस्तीची व देशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय वर्दळ असलेली मुंबई करोनाच्या विळख्यात अडकत आहे.

या महामारीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जनतेचा प्रतिसाद व प्रशासकीय नियोजन याचा योग्य रीतीने वापर करण्याचे कार्य नेटाने सुरू आहे. जनतेतून त्यास प्रचंड समर्थन, सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, त्यामुळेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाचा तिळपापड झाला आहे, अशी टीका भोर यांनी केली आहे.

राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना महाराष्ट्रातले भाजपचे नेते केंद्राला मदत करण्याचे आवाहन करीत होते. राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस व इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी आपले मानधन राज्य सरकारच्या मदत निधीत जमा करीत असताना भाजपच्या आमदार, खासदारांचा सरकारी तिजोरीतून मिळणारे मानधन पक्षाच्या स्वनिधीत जमा केला जातो. त्यांच्या अशा कृतीमुळे या मंडळींच्या निष्ठा नक्की राज्याच्या जनतेशी आहेत का, असा सवालही भोर यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.