१२ जणांचा अहवाल निगेटिव्ह; वडगांव झांजे करोनामुक्तीकडे
वेल्हे (प्रतिनिधी) : कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या वेल्हे तालुक्यातील वडगाव झांजे या गावातील १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सध्या पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी मागील १४ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या १० रुग्णांनी नवले हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत होते. सोमवारी (दि.२५) रात्री उशिरा ५ जणांनी तर मंगळवार (दि.२६) उर्वरित ५ जणांनी कोरोनावर मात केली असून १० जणांना हॉस्पिटल प्रशासनाकडून घरी सोडण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील ३६ व ३२ वर्षीय पतीपत्नी शनिवारी (दि.२३) कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना नवले हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील ६ जणांना रविवारी (दि.२४) तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी बाधित व्यक्तीचे वडील (वय ८०), आई (वय ७०) व एक मुलगी (वय १२) असे तिघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.उर्वरित १०, ८ वर्षांच्या दोन मुली व ६ वर्षांचा एक मुलगा अशा तिघांचे अहवाल निगेटिव्ह निगेटिव्ह निघाले होते.
तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कातील आणखी १२ जणांना सोमवारी तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल बुधवार (दि.२७)निगेटिव्ह आले असून तालुक्यातील करोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सध्या वडगाव झांजेमधील एकूण २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून फक्त ५ जणांवर उपचार चालू आहेत. कोरोनामुक्त झालेल्या सर्व रुग्णांनी नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत.
वेल्हे तालुका कोरोना संकिर्ण माहिती
-एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या – ३२
-एकूण मृत रुग्णसंख्या – २
-एकूण कोरोनामुक्त रुग्णसंख्या – २५
-सध्या उपचार घेत असलेले रुग्णसंख्या – ५