अखेर बाबूल सुप्रियोंनी पूर्ण केली औपचारिकता; महिनाभराने खासदारकीचा राजीनामा

नवी दिल्ली  – भाजपला रामराम ठोकणाऱ्या बाबूल सुप्रियो यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला. तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर महिनाभराने त्यांनी राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण केली.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुप्रियो यांनी राजीनामा सादर केला. बॉलीवूड आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील गायक असणाऱ्या सुप्रियो यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये दाखल होऊन राजकीय इनिंग सुरू केली.

पश्‍चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून ते सलग दोन वेळा भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले. त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांवेळी त्यांना डच्चू देण्यात आला. त्या नाराजीपोटी ते भाजपमधून बाहेर पडले. राजकारण सोडण्याचा इरादाही त्यांनी जाहीर केला. मात्र, अचानकपणे त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

आता त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आसनसोलमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागेल. त्या पोटनिवडणुकीत तृणमूल सुप्रियो यांना उमेदवारी देणार का आणि आसनसोलची जागा राखण्यात भाजपला यश मिळणार का, याविषयी आता उत्सुकता असेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.