अखेर 4 कोटी परत मिळवण्यात यश

खासगी कंपनीची फसवणूक प्रकरण

पुणे – औंध परिसरातील एका खासगी कंपनीची 4 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात सायबर चोरट्यांनी बनावट ई-मेल पाठवून दुसऱ्याच एका बॅंक खात्यात रक्‍कम पाठविण्याची सूचना केली होती. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केलेल्या प्रयत्नांमुळे 4 कोटी 13 लाख रुपयांची रक्‍कम हॉंगकॉंग येथील न्यायालयाच्या आदेशाने परत मिळवण्यात यश आले आहे. टी सिस्टीम आयटीसी इंडिया प्रा. लि. कंपनीने एका व्यवहारात डच बॅंकेच्या औंध शाखेतून हॉंगकॉंग येथील स्टॅंडर्ड चार्टड्‌ बॅंकेत 4 कोटी 13 लाख रुपये मागील वर्षी 31 ऑगस्ट रोजी पाठविले होते.

दरम्यान, कंपनीकडून शहानिशा करण्यात आली. तेव्हा चोरट्यांनी पाठविलेला ई-मेल बनावट असल्याचे निदर्शनास आले होते. कंपनीकडून याबाबत सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हॉंगकॉंग येथील स्टॅंडर्ड चार्टड बॅंकेला पत्रव्यवहार केला. ज्या खात्यात चोरट्यांनी पैसे जमा करण्याची सूचना केली होती ते खाते तातडीने गोठविण्यात यावे, अशी विनंती हॉंगकॉंग पोलीस तसेच बॅंकेकडे करण्यात आली.

त्यानंतर हॉंगकॉंग येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून फसवणुकीच्या गुन्ह्यात चोरलेली रक्‍कम परत करण्यात यावी, असा दावा दाखल केला. हॉंगकॉंग न्यायालयाच्या आदेशानंतर ही रक्‍कम परत मिळवण्यात आली. सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, सहायक निरीक्षक सागर पानमंद, प्रसाद पोतदार आदींनी ही कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.