अखेर फरार खंडेराव जाधव गजाआड…

इस्लामपूर (प्रतिनिधी):  इस्लामपूरच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या अंगावर खुर्ची घेऊन धावणारा राष्ट्रवादीचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याला पोलिसांनी आज रविवारी पहाटे आंबा (जिल्हा कोल्हापूर) येथील घाटातील एका फार्महाऊवर जेरबंद केले. त्याला मदत करणारा पोलीस कर्मचारी अवधूत इंगवले आणि फार्म हाऊसवर आसरा देणारा रणवीर गायकवाड या दोघांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. जाधव याला न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी अटक केलेला कोकरूड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अवधूत इंगवले याला उद्या सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर आंबा घाटातील ‘सवाई मानसिंग’ फार्म हाऊसचा मालक रणवीर गायकवाड याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. लवकरच त्यालाही अटक करू अशी माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘खंडेराव जाधव याने सोमवारी २७ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कंटेन्मेंट झोनमधील त्याच्या भावजयीच्या नावावर असलेल्या न्यू राजभवन या बियरबार मधून नगरपालिकेच्या घंटागाडीतून दारूची चोरटी वाहतूक केली होती. ही बाब लक्षात येताच त्या प्रभागाचे नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्याकडे तक्रार केली. पवार यांनी तातडीने सदरची बाब गंभीर असल्याने पोलिसांशी संपर्क साधून संबंधित गाडी आणि चालकावर कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी संबंधित चालकाला गाडीसह ताब्यात घेऊन चौकशी सुरू करताच अस्वस्थ झालेल्या खंडेराव जाधव याने थेट मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये जावून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने मुख्याधिकाऱ्यांना अत्यंत हीन पातळीवर शिवीगाळ करून खुर्ची घेऊन मारण्यासाठी अंगावर गेला. अनपेक्षित घडलेल्या प्रकाराने मुख्याधिकारी पवार गोंधळून गेल्या. त्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत २७ एप्रिलला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी २८ एप्रिलला घंटागाडीतून दारू वाहतूक केल्याप्रकरणीही पवार यांनी दुसरी फिर्याद दाखल केली. हे सर्व प्रकरण अंगाशी येत असल्याचे लक्षात येताच खंडेराव जाधव फरार झाला. त्याने बुधवारी २९ एप्रिलला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सोमवारी दोन मे ला त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. तेव्हापासून तो पोलीसांच्या रडारवर होता.

विविध राजकीय पक्षांनी त्याला तातडीने अटक करावी याबद्दल जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांच्यासह विविध ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी केली होती. या सर्व प्रकरणात समाजाच्या सर्वच स्तरात पोलिसांच्याबद्दल संशय व्यक्त होत होता. त्यामुळे पोलिसही प्रचंड दबावाखाली होते.
पिंगळे म्हणाले, ‘गेल्या चार दिवसांपासून अहोरात्र याच व्यापात पोलीस टीम होती. दुर्दैवाने पोलीस कर्मचारीच त्याला फितूर असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या नकळत त्याच्यावर पाळत ठेवून तपासाची चक्रे फिरवली. शनिवारी रात्री उशिरा तो आंबा घाटातील ‘सवाई मानसिंग’ या फार्म हाऊसवर असल्याचे समजल्यावर पोलिसांचा ताफा पोहोचला.

रविवारी पहाटे चार वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला मदत करणारा पोलीस शिपाई अवधूत इंगवले यालाही ताब्यात घेतले आहे. फार्म हाऊस चा मालक रणवीर गायकवाड याला आरोपी केले असून लवकरच त्यालाही अटक करणार आहोत. या प्रकरणात २८ एप्रिल ते १० मे या कालावधीत जाधव याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या त्याच्या इतर साथीदारांनाही या गुन्ह्यात अटक करणार आहोत.’

जिल्हा पोलिस प्रमुखांकडून पथकाचे कौतुक…

जाधवच्या अटकेच्या कारवाईनंतर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी कारवाईत सहभागी झालेल्या पथकाचे कौतुक केले असून त्यांना भरघोस बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. हे पथक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक गणेशप्रसाद भरते, ज्ञानेश्वर वाघ, हवालदार दीपक ठोंबरे, बाजीराव पाटील, शरद जाधव, अरुण पाटील, शिपाई उमेश राजगे, प्रशांत देसाई, आलमगीर लतीफ, शशिकांत माने यासह सांगली सायबर सेलच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

इंगवलेच्या निलंबनाचा प्रस्ताव

जाधवला मदत करणाऱ्या पोलीस हवालदार इंगवले याला उद्या सोमवारी न्यायालयात हजर करण्यात असल्याचे तसेच जिल्हा पोलिस प्रमुखांना इंगवलेच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला असल्याचे श्री. पिंगळे यांनी सांगितले. दरम्यान , जिल्हाबंदी आदेशाचा भंग करून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केल्याबद्दल जाधववर कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

गायकवाड हा प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील

कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित राजकिय कुटुंबातील रणवीर गायकवाड याने त्याच्या आंबा घाटातील ‘सवाई मानसिंग’ या फार्म हाऊस वर जाधव याला आसरा दिल्याने त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. रणविर हा माजी खासदार उदयसिंह गायकवाड यांचा नातू असल्याचे श्री. पिंगळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.