मुंबई : राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर बुधवारी सह्याद्री अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चे अंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडून याची घोषणा केली जाईल. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार आहे.
एसटी कर्मचारी कृती समिती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली होती, बुधवारी संपाचा दुसऱ्या दिवशी राज्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा असतानाच हा संप पुकारण्यात आल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल, 2020 पासून सरसकट मुळ वेतनात 6500 रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
अशी मिळेल वाढ
भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांची पगार वाढ केलेली आहे. ज्यांच्या पगारामध्ये 2021 पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना 2021 मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 4 हजारांची वाढ झाली आहे. मी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.