पुसेगाव, (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असलेल्या मौजे खातगुणला अखेर काल दसऱ्याच्या मुहूर्तावर एस. टी. बस आली. यावेळी फलटण – वडूज व वडूज- सातारा या गाड्यांचे पूजन सरपंच अमिना सय्यद, उपसरपंच बाळासाहेब लावंड,
सोसायटी चेअरमन ज्ञानदेव लावंड, माजी चेअरमन विजय लावंड, देवस्थान चेअरमन अरुण यादव, राव यादव, खातगुण ग्रामपंचायतीचे सर्व सभासद व सोसायटी सदस्य, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी एसटी बस चालक व वाहक यांचा शाल व श्रीफळ देऊन अरुण विठ्ठल लावंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खातगुण गावात एसटी थांबा मिळावा, यासाठी अगस्ती अरुण लावंड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले, त्यामुळे त्यांचे आभार गावकऱ्यांनी मानले. खातगुणमध्ये एसटी यावी, ही अनेक वर्षांची मागणी अखेर मंजूर झाली.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे संवादिनीचे अध्यक्ष अगस्ती अरुण लावंड यांनी पाठपुरावा केला होता. एसटी बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, वृद्ध आणि भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
क वर्ग देवस्थान असलेल्या खातगुणमध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही एसटी आली नव्हती यांची खंत गावकऱ्यांच्या मनात होती.
गावची लोकसंख्या सुमारे 4000 च्या आसपास आहे. गाव मोठे असले तरी कॉलेजची व्यवस्था नाही. गावात दवाखाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व रुग्णांना खटाव, पुसेगाव, कोरेगाव, फलटण वा साताऱ्याला जावे लागते.
पण तिथे जाण्यासाठी गावाच्या बाहेर दोन ते अडीच किलोमीटर मुख्य रस्त्यावर येऊन एसटी बस पकडावी लागते. याचा फटका विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणावर पडत आहे. शाळा, कॉलेजच्या हजेरीवर याचा परिणाम होत होता. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो.
खातगुणमध्ये राजेबागसार पीरसाहेबांचा दर्गा आहे. तिथे शेकडो भाविक येत असतात. पण खासगी गाड्या आहेत, तेच येऊ शकतात.
मुख्य रस्त्यावरून गावात एसटी बस यायला जेमतेम 2 मिनिट लागतात. अगस्ती लावंड यांनी एसटी व्यवस्थापकीय संचालकांना सांगितली होती. लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला.