गुरुमाऊलीत अखेर फूट; शिक्षक परिषदेच्या झेंड्याखाली नवा गट

नगर  – शिक्षक बॅंकेत पैसे कमावणे हा माझा हेतू कधीच नव्हता. त्यामुळे अध्यक्षपद सोडून जातानाचे दु:ख कधीच नव्हते. मी सर्वसामान्य शिक्षकांच्या सुख-दुखात कायम सहभागी होतो अन कायम राहिल. शिक्षक संघ सोडताना मनाला प्रचंड वेदना होत आहेत. पण मी बॅंकेत एक रूपया जरी खाल्ला असेल तर माझी नार्को टेस्ट करावी असे आव्हान विरोधकांना देत शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांनी शिक्षक परिषदेचा नवा झेंडा हातात घेतला आहे.

शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळात बापू तांबे व रावसाहेब रोहोकले गटात गेल्या काही काळापासून सुरु असलेला संघर्ष आज संघटनेत फूट पडून अधोरेखित झाला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या संघटनेत आता रोहोकले गट काम करणार असून जिल्हा पातळीवर गुरुमाऊली मंडळ या नावानेच काम सुरु असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा मेळावा आज रोहोकले गटाने नगर येथील ओम गार्डन येथे आयोजित केला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार भगवान साळुंके हे होते. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर,शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे अध्यक्ष राजेश सुर्वे आदी उपस्थित होते.मेळाव्यास सुमारे अडीच हजार शिक्षक उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. यावेळी विविध शिक्षक संघटनांतील कार्यकर्त्यांनी शिक्षक परिषदेत प्रवेश केला.

प्रास्तविक विकास डावखरे यांनी केले. यावेळी टेमकर,तांबे,संजय शेळके,बाबासाहेब बोडखे,आदींची भाषणे झाली. रोहोकले म्हणाले,सगळ्या शिक्षक संघटनांना सेवानिवृत्त शिक्षक नेते चालतात.केवळ माझ्या नावाची एलर्जी का आहे.मी कधीच कुणाचा व्यक्‍तीव्देष केला नाही.कुणाच्या बद्दल कधीच सोशल मिडीयावर एक शब्दही लिहीत नाही व माझ्या समर्थकांना पण चुकीचे लिहू देत नाही.पण मी बॅंकेत भ्रष्टाचार करू देत नाही म्हणून सगळे जण जिल्हा समन्वयच्या नावाखाली एक झाले आहेत. यांचे सर्वांचे कारभार शिक्षक सभासदांनी बघीतले आहेत. ज्यांच्या अंगाला दिवसभर दारुचा वास असतो ते माझ्यावर दारू पिण्याचा व धाब्यावर जेवत असल्याचा बालीश आरोप करत आहे.

या ठिकाणची उपस्थिती बघून सर्वसामान्य शिक्षक माझ्या विचारांसोबत आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.मला शिक्षक पुढाऱ्यांची आवश्‍यकता नाही.सर्वसामान्य प्रामाणिक शिक्षक ही माझी खरी ताकद आहे. संचालक होण्यासाठी दहा दहा लाख रूपये खर्च करण्याची पध्दत मी बंद केली. 900 तलाठी आठ कोटींचे संकुल उभारतात.आपण बारा हजार शिक्षक एक संकुल का उभारू शकत नाही असा सवाल करत रोहोकले यांनी विकास मंडळ संकुलाचे समर्थन केले.

मंत्र्यांची अनुपस्थिती तर शिक्षकांची गर्दी
या मेळाव्यास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे,पालकमंत्री राम शिंदे,विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी व्यासपीठावरील बोर्डवर लिहीले होते,मात्र या सर्वांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली मात्र या मेळाव्यास निमंत्रित विविध कारणांनी अनुपस्थित असले तरी जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती. सभागृह संपूर्ण भरून बाहेरही मोठ्या प्रमाणात शिक्षक उभे होते.त्यामुळे रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वावर असलेला जिल्ह्यातील शिक्षकांचा विश्‍वास पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

प्रवीण ठुबे, विकास डावखरे, मीनाक्षी तांबे नवे पदाधिकारी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची नगर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : प्रवीण ठुबे, कार्याध्यक्ष : राम निकम, सरचिटणीस : दत्ता गमे गुरूमाऊली मंडळ: अध्यक्ष: विकास डावखरे,कार्याध्यक्ष:राजू इनामदार,सरचिटणीस : बाळासाहेब शेळके उच्चाधिकारी समिती : अध्यक्ष : आर.पी.राहणे, कार्याध्यक्ष : प्रल्हाद गजभिव, सरचिटणीस : शशि सावंत जिल्हा महिला आघाडी : अध्यक्षा : मीनाक्षी तांबे, कार्याध्यक्षा : अंजली मुळे, सरचिटणीस : अनिता काळे राज्य कार्यकारिणी : संजय शेळके, श्रीकृष्ण खेडकर, राजू जायभाय, संजय म्हस्के, नागेश लगड.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)