नवी दिल्ली – जामिया मिलीया विद्यापीठातील गर्भवती विद्यार्थी आंदोलक सफुरा झर्गर हिला दिल्लीतील दंगलीच्या प्रकरणात सहभागी झाल्याच्या कारणावरून दहशतवाद विरोधी कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. तिच्यावरील या कारवाईच्या विरोधात अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठवला होता. ती गर्भवती असल्याने तिची कारागृहातून त्वरीत सुटका करावी अशी मागणी या संघटनांनी केली होती. तिला आज अखेर जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने तिला मानवतावादी भूमिकेतून जामीन मंजूर केला.
या निर्णयाला दिल्ली पोलिसांनी विरोध केला नाही. 27 वर्षीय सफुराला 10 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. पंधरा दिवसांतून एकदा तरी दिल्ली पोलिसांशी फोन वरून संपर्क करावा आणि कोणत्याही आक्षेपार्ह आंदोलन अथवा कारवायांमध्ये सहभागी होऊ नये या अटींवर तिला सोडण्यात आले आहे. दहा हजाराच्या बॉंडवर तिला सोडण्यात आले आहे.
सफुरा ही जामिया विद्यापीठाची एमफिलची विद्यार्थिनी असून ती पाच महिन्यांची गर्भवती आहे. जाफराबाद येथे झालेल्या दंगलीत तिने महिला व मुलांना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून तिच्यावर दहशतवाद विरोधी कलमांन्वये कारवाई करण्यात आली होती.