पुणे – अभिनेत्री ऋचा चढ्ढा सध्या “शकीला’ या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. तिने अलीकडेच “मॅडम चीफ मिनिस्टर’ या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले होते. या सिनेमात ती राजकीय नेत्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. पोस्टरमध्ये तिच्या हातात झाडू दाखवला गेला आहे. ही गोष्ट काही लोकांना अजिबात आवडली नाही.
ऋचा चढ्ढाने या मुद्द्यावरून सर्व संबंधितांची माफी मागितली आहे. हा सिनेमा आपल्यासाठी एक प्रशिक्षणाचा अनुभव आहे. पोस्टर रिलीज करताना नागरिकांच्या भावना काय असू शकतील याचा विचार केला गेला नव्हता. लोकांना राग येणे स्वाभाविक आहे.
मात्र, हा प्रमोशनचा प्रयत्न होता असे ऋचाने आपल्या या निवेदनात म्हटले आहे. या पोस्टरबाबत तिने निर्मात्यांना दोष दिलेला नाही. हे वादग्रस्त पोस्टर निर्मात्यांनी तातडीने हटवून नवीन पोस्टर रिलीज केले गेले आहे.
लोकांनी आपल्याला क्षमा करावे आणि हा सिनेमा जरूर बघावा, असे आवाहनही ऋचा चढ्ढाने केले आहे. यापूर्वी “पद्मावत’ आणि “मणिकर्णिका’ या सिनेमांच्यावेळी काही गटांनी तीव्र आक्षेप घेऊन आंदोलन केले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी ऋचा चढ्ढाने वेळेपूर्वीच घेतली आहे.