विश्वास संपादन करण्याचा निर्धार : विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा सक्रिय
मला हाक द्या
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी तयारीला लागावे. आत्तापासूनच जोमाने तयारी सुरु करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. कोणतीही अडचण येऊ द्या, मला हाक द्या, मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा तुमच्या मदतीसाठी मी येईल, असा शब्द पार्थ यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
पिंपरी – निवडणुकीनंतर मतदारसंघात न दिसलेले पार्थ अजित पवार यांनी अखेर आभार दौरा सुरू केला आहे. मावळ लोकसभा मतदार संघात झालेला पराभव मान्य करून, जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पार्थ पवार यांनी मावळमधील आभार दौऱ्याला सुरुवात केली आहे. लोकशाहीत जनतेने दिलेले कौल मान्य आहे. आपण कुठे कमी पडलो, कोणत्या चुका झाल्या. त्याचे परीक्षण केले जाईल. त्या चुका दुरुस्त करुन पुन्हा जनतेमध्ये जाऊन त्यांचा विश्वास संपादन करु, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी व्यक्त केला.
या दौऱ्याअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील मतदार, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ते आभार मानणार आहेत. . मंगळवारी (दि.11) सकाळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यादरम्यान दापोडी, पिंपरी, मोरवाडी, काळभोरनगर प्रभागातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. निवडणुकीत केलेल्या प्रचाराबद्दल सर्वांचे आभार मानले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू बनसोडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप यावेळी उपस्थित होते. पराभवानंतरही पार्थ पुन्हा मतदारसंघात सक्रिय झाले असून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.