सावंतवाडी – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजप आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर झाले. तसेच नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे आरोपी आहेत. कणकवली पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायलयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
या आदेशाविरोधात राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राणे यांना 10 दिवसांत जिल्हा न्यायलयात शरण जाण्याचे निर्देश दिले. तसेच राणे यांना 10 दिवस अटकेपासून संरक्षण दिले.
या आदेशानंतर आज नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांचे बंधू निलेश राणेदेखील उपस्थित होते. नितेश राणे यांच्या बाजूने ऍड. सतीश मानशिंदे आणि ऍड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. तर सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत यांचे म्हणणे कोर्टाने मागवले. ऍड. भूषण साळवी यांनी ऑनलाइन सरकारी वकील म्हणून बाजू मांडली. मात्र, ऍड. घरत हजर नसल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आहे.