…अखेर नाझरे धरणातून विसर्ग घटला

जेजुरी – कऱ्हा नदीला महापूर आल्याने बुधवारी (दि. 25) रात्री नाझरे धरणातून 85 हजार क्‍युसेकने पाणी सोडले. पुरामुळे गराडे, पुरंदर पायथा आणि बारामती तालुकयतील नदीच्या पात्रालगतच्या अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 26) पाऊस ओसरल्याने धरणातून विसर्ग कमी केला असून ते सात हजार क्‍युसेकवर स्थिरावला असल्याने कऱ्हाकाठच्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

पूरामुळे नाझरे, कोथळे आदी गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. नदीला पूर आल्याने गराडे धरण फुटल्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती. बेलसर रस्त्यावर दोन कंटेनर अडकून पडल्यामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली. कोथळेच्या पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. कोथळे येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात घुसल्याने शाळेची संरक्षक भिंत पडली. माध्यमिक शाळेजवळ मातीचा बंधारा वाहून गेला आहे. नाझरे धरणाखाली आणि माळशिरस व इतर सहा गावांना जोडणारा कऱ्हा नदीवरील नाझरेचा पूल वाहून गेला आहे. नाझरे, राणेमळा व नदी काठावर असणाऱ्या वाड्या-वस्त्यांमध्ये पुराचे पाणी घुसले होते.

दोन दिवसांच्या पावसामुळे प्रथमच पूर
1974 मध्ये कऱ्हा नदीवर नाझरे गावाच्या हद्दीत नाझरे (मल्हार सागर जलाशय) धरण बांधण्यात आले. तेव्हा धरणाची पाणीसाठा क्षमता 588 दशलक्ष घनफूट होती. 1990 मध्ये धरणाच्या सांडव्यावर पाच फूट गेट उभारण्यात आले. त्यामुळे पाणीसाठा क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी झाली. पुरंदरमध्ये सरासरी पर्जन्य 496 मिलीमीटर असल्याने अनेकवेळा धरण कोरडेच असते. उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई असते. सात वर्षांपूर्वी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यानंतर मागील महिन्यात धरण पूर्ण भरले आणि दोन दिवसांच्या पावसामुळे पहिल्यांदाच पूर परिस्थिती पाहण्यास मिळाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.