अखेर मंत्री संजय राठोडांनी पूजा चव्हाण प्रकरणी मौन सोडले; म्हणाले,…

"चौकशीतून जे समोर येईल, ते बघा"

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे, पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, यावेळी त्यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वन मंत्री संजय राठोड पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. आज त्यांनी पोहरादेवी येथे सहकुटुंब जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर सेवालाल महाराजांचंही दर्शन घेतलं. त्यानंतर राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती, बंजारा समाजावरील संकट दूर व्हावं यासाठी याठिकाणी यज्ञाचे आयोजन केले होते, त्यानंतर राठोड यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

संजय राठोड म्हणाले, “पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुःख. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि समाज सहभागी आहे. मी ओबीसी समुदायाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझं राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माध्यमांनी जे दाखवलं, त्यात कोणतंही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपास करत आहेत. पण, माझी आणि समाजाबद्दल घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकशीतून जे समोर येईल. ते बघा…,” असं म्हणत संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केले.

पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी ७ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव समोर आले होते.

संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंग होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.