पुणे –पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला आधी राज्य सरकारने मान्यता दिली होती. आता या प्रकल्पाला नीती आयोग आणि रेल्वे मंत्रालयानेदेखील हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या मार्गाला आणखी वेग मिळणार आहे. तसेच प्रकल्पासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या 20 टक्के रक्कम रेल्वे मंत्रालय देणार आहे.
पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रेल कार्पोरेशनच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. त्यापैकी प्रत्येकी 20 टक्के खर्च हा राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. उर्वरित 60 टक्के निधी हा कर्जरुपाने उभारण्यात येणार आहे. त्यापैकी 20 टक्के निधी राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाकडून 20 टक्के निधी देण्याबाबत अद्याप मान्यता मिळाली नव्हती. मागील वर्षी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पात तत्वत: मान्यता दिली होती. दरम्यान, पुन्हा रेल्वे मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला नीती आयोग आणि रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे.