अखेर करोना कॉलर ट्यूनपासून सुटका; मात्र…

मुंबई – करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी एक कॉलर ट्यून तयार करण्यात आली होती. कोणाला फोन लावला की फोन लावणाऱ्याला बॉलिवुडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा खर्जातला आवाज ऐकायला यायचा. बच्चन यांचा आवाज आणि करोबाबत निर्माण झालेले भय यामुळे प्रत्येक वेळी वाक्‍ये पाठ झाली असतानाही ती ट्यून ऐकली जायची.

मात्र खूप झाले अन हसू आले असाही प्रकार झाला. कारण फोन करतानाची तातडी आणि इमर्जन्सी पाहता ती ट्यून ऐकण्याची मुळीच इच्छा नसतानाही ती ऐकावी लागत होती व त्यामुळे फोनधारकांचा त्रागाही वाढला होता. या ग्राहकांनी सुटकेचा निश्‍वास टाकावा अशी बातमी आहे. लवकरच ती ट्यून बंद होणार आहे.

अर्थात हा आनंदही फार काळ उपभोगता येणार नाही. त्याला कारण ही ट्यून गेल्यावर नवी म्हणजे करोनाच्या लसीकरणाशी संबंधित ट्यून सुरू केली जाणार आहे. तीही बच्चन यांच्याच आवाजात असणार आहे, असे म्हटले जाते आहे. बच्चन यांच्या आवाजाला विरोध नाही. मात्र हात धोना, मास्क पहनना और दो गज दूरी बनाए रखना हे बऱ्यापैकी अंगवळणी पडले असताना त्या ट्यूनचा अतिरेक झाला आहे.

प्रत्येक फोनच्या अगोदर इच्छा आणि वेळ असो वा नसो ती ट्यून ऐकावीच लागली होती. करोनाच्या जागृतीसाठी करण्यात आलेली ट्यून अखेर चेष्टेचाच विषय ठरली होती. त्यातून किमान आता सुटका होणार असल्याची बातमी आहे. आता देशभरात करोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे.

अगोदरची ट्यून बंद करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. या कॉलर ट्यूनमुळे सगळेच ग्राहक त्रस्त असून, ही ट्यून लवकरात लवकर बंद करण्यात यावी, अशी सगळ्यांच्या वतीने विनंती असे या याचिकेत म्हटले होते. शुक्रवारपासून (15 जानेवारी) कोरोना कॉलर ट्यून हटवून त्या ऐवजी लसीकरणाची नवी ट्यून लावण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.