देहूकरांचे स्वप्न पूर्ण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली अधिसूचना प्रसिद्ध
देहूगाव – देहूगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे यासाठी गाव कारभाऱ्यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्याला अखेर मंगळवारी (दि. 8) यश मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देहू नगरपंचायतीच्या अधिसूचनेचे पत्र आमदार सुनील शेळके आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थानकडे सुपूर्त करण्यात आले.
एकूण 17 सदस्य असलेली देहू ग्रामपंचायत आहे. देहू हद्दीत तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत विकास झाल्यानंतर नागरी क्षेत्राची प्रचंड वाढ झाल्याने हा डोलारा सांभाळताना ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होताना दिसत आहे. अशातच गेल्या सहा वर्षांपासून ग्रामपंचायत बरखास्त करून देहूच्या अस्तित्वासाठी स्वतंत्र नगरपंचायत स्थापन करावी, अशी मागणी जोर धरत होती.
याबाबत सुमारे आठ वर्षांपासून देहूकराने जोर धरला होता. ग्रामसभेत वेळोवेळी ठरावही मंजूर करून वरिष्ठांकडे पाठविण्यात आले होते. अनेकांनी महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास विरोधही दर्शवला होता. सन 2016 मध्ये याबाबत तत्कालीन सरकारने सकारात्मक पावले उचलत गावची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र आणि चतु:सीमा जाहीर केल्या होत्या.
मात्र त्यानंतर पुढील कार्यवाही होऊ शकली नाही. मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी याप्रकरणाचा पाठपुरावा केल्याने अखेर मंगळवारी अजित पवार यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. या वेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे मधुकर महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अभिमन्यू काळोखे, राष्ट्रवादीचे प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, रत्नमाला करंडे, मधुकर कंद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपंचायतीच्या सीमा पुढील प्रमाणे :
पूर्वेस – पिंपरी चिंचवड महागनगर पालिका तळवडे शीव,
पश्चिमेस – मावळ हद्द उर्वरित भाग खेड, इंदोरी शीव, सांगुर्डी शीव, राजगुरूनगर (खेड) देहूरोड कॅंटोंमेंट बोर्ड, खालुंब्रे शीव,
दक्षिणेस- निगडी, चिंचोली, देहूरोड कॅंटोमेंट बोर्डाची हद्द,
उत्तरेस- खालुंब्रे, सांगुर्डी ता. खेड शीव.
याप्रमाणे देहूगाव ग्रामपंचायतीची हद्द असेल.
नव्याने स्थापन
होणाऱ्या नगरपंचायतीचे क्षेत्र देहूगावातील सर्व्हेनंबर 1 ते 139 माळीनगरातील सर्व्हे नंबर 1 ते 163 व विठ्ठलनगर मधील सर्व्हे नबंर 1 ते 101 असे असेल अशी अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.