मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा रंगू लागली होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अयोध्येमध्ये जाऊन आले असून, यावेळी त्यांच्याकडून महाआरती देखील करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे अयोध्येला नेमकं कधी जाणार हे कोणालाच माहित न्हवत.
आता त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली असून येत्या 6 एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदारदेखील अयोध्येला जाणार असून ते रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी शिवसेनेकडून अयोध्येत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आणि आता सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे आपल्या आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने सगळीकडे चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या या दौऱ्याबाबत स्पष्टता देण्यात आली होती. यावेळी ते म्हंटले की, “अयोध्या हे आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ.” असं ते म्हणाले होते. त्यामुळे आता शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे.