डेहराडून – फाटक्या जीन्सवरून केलेले वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या चांगलच अंगलट आले आहे. रावत यांच्यावर देशभरातून टीका झाल्यानंतर अखेर त्यांनी माफी मागितली आहे.
माझे विधान भारतीय मूल्य आणि संस्कृतीच्या संदर्भाने होते. तरीही माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे तीरथ सिंह रावत यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर रावत यांच्या पहिल्याच विधानाने वाद उठल्यानंतर त्यांची पत्नी रश्मी रावत यांनी त्यांचे समर्थन केले होते. रावत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. त्यांनी ज्या संदर्भाने रिप्ड जीन्सबाबत विधान केले होते, त्याचा अर्थ समजून घेतला गेला नाही, असे रश्मी रावत यांनी म्हटले होते.
रावत यांनी 17 मार्च रोजी देहरादून येथील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले होते. तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ घसरली. मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते.
दुसऱ्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले की, वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो, मात्र करवाचौथच्या या एका दिवशी तरी त्यांचे मन राखावेच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितलं तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता, असे रावत म्हणाले. मी तिची विचारपूस केली तेव्हा तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. मी स्वयंसेवी संस्था चालवते असे तिने सांगितले. मात्र, गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुले आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार, असा सवाल त्यांनी केला होता.