अखेर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या ट्रायलवरील बंदीची शिफारस मागे

जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. या औषधाचा वापर मलेरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी होतो. या दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे सांगितले होते. अखेर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने मागे घेतली आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसुस यांनी याविषयी माहिती दिली. बोर्डाने अभ्यास करुन कोरोना मृत्युदरांचा आढावा घेतला आहे. या दरम्यान हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन  चाचणी सुधारित करण्याचे कोणतेही कारण नाही, असे आढळले. त्यामुळे डब्ल्यूएचओने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर सुरु असलेल्या संशोधनात सहभागी संशोधकांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यास गेब्रेयेसुस यांनी सांगितले आहे.

हा विज्ञानाचा मोठा विजय असल्याचे संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी म्हटलं आहे. भारताने या ट्रायल थांबवण्यासाठी विरोध केला होता. WHO कडून ही शिफारस मागे घेतल्यानंतर सीएसआयआरच्या डॉ शेखर मांडे यांचंही माशेलकर यांनी कौतुक केलं आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनने कोरोना बरा होतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे. सुरवातीला काही अडचणी आल्या म्हणून संशोधन थांबवायला नको असं माशेलकर यांचं म्हणणं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.