अखेर सुपा औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटप सुरू

सुपा  – पारनेर तालुक्‍यात नव्याने सुरू झालेल्या म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीसाठी सुमारे 946 हेक्‍टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यापैकी 573 हेक्‍टर जमिनीचे भूसंपादन अतापर्यंत करण्यात आले आहे. संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित क्षेत्राच्या 15 टक्के भूखंडाच्या परताव्याचे (देकारपत्र) वाटप अखेर सुरू झाले आहे.

औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादीत शेतकऱ्यांच्या जमिनीपैकी 15 टक्के भूखंड शेतकऱ्यांना परत मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्यासह शेतकरी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा धरणे आंदोलने व उपोषणे करण्यात आली. अखेर या लढ्याला यश मिळाले असून, प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना भूखंडाचे वाटप सुरू झाले असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

भूसंपादन केलेल्या गावांत जाऊन एमआयडीसीचे अधिकारी शेतकऱ्यांना थेट परताव्याची पत्र देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्णाण झाले आहे. पारनेर तालुक्‍यात नव्याने म्हसणे फाटा येथे जापानीज हब उभा राहात आहे. या एमआयडीसीसाठी आपधूप, बाबुर्डी, पळवे, म्हसणे व वाघुंडे या गावांतील शेतकऱ्यांची सुमारे 946 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावयाची आहे. सध्या 573 हेक्‍टर जमिनीचे संपादन झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन झाले आहे, त्या शेतकऱ्यांना 15 टक्के भूखंडाचा परतावा देण्यात येत आहे. सुमारे 85.97 हेक्‍टर भूखंडाच्या परताव्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे.

जमीन अधिग्रहणाच्या वेळी झालेल्या करारातच जमिनीचा बाजारभाव व द्यावयाचा परतावा निश्‍चित करण्यात आला होता. त्यानुसार त्या परताव्याच्या देकाराचे वाटप जमीन संपादीत केलेलल्या गावांत सुरू आहे. एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांच्या आदेशान्वये एमआयडीसीचे अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड, एस. के. राठोड, बंडू ढमाले, बाळासाहेब चौधरी हे या जमिनींचे वाटप करत आहेत. आधूप येथे उत्तम गवळी, पांडुरंग गवळी, संगीता सोनवणे, वाघुंडे येथे चंद्रकला साठे, अंजली सुपेकर, पळवे येथे रतन बोरुडे, कांताबाई डोईफोडे यांच्यासह अनेकांना परातावा पत्र देण्यात आले. गेली दोन दिवसांपासून वरील अधिकारी आपधूप, पळवे, वाघुंडे व म्हसणे या गावातील शेतक-यांना गावात जाऊन परताव्याचे पत्र देत आहेत.

येथील शेतकऱ्यांनी आम्हाला मोठे सहकार्य केले. येथे लवकरच जागतिक दर्जाचे जापनीज हब उभे राहणार आहे. भविष्यात ही एमआयडीसी राज्यातच नव्हे, तर देशात एक मोठी व आदर्श एमआयडीसी म्हणून नावारूपाला येणार आहे.

हेमांगी पाटील ,प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी (नाशिक)

सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना ज्या दराने संपादित केल्या त्याच दराने परतावा दिला आहे. एमआयडीसीमध्ये संपूर्ण जमीन गेल्याने शेतकरी बेघर झाले होते. भूखंड परताव्यामुळे शेतकऱ्यांनाही उद्योजक बनण्याची सरकारने संधी दिली आहे. जमीन मिळाल्याने आम्हाला उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे.

उत्तम गवळी,शेतकरी, आपधूप 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)