मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही दालनाचा ताबा न घेतलेल्या अजित पवारांनी आता सहाव्या मजल्यावरील नव्या दालनात प्रवेश केला आहे. सोमवारी पवार यांनी आपल्या नव्या कार्यालयात प्रवेश करीत कामकाजाला सुरुवात केली.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्या मजल्यावरील 602 क्रमाकांचे दालन मिळाले होते. हे दालन शापित दालन म्हणून ओळखले जाते. या दालनातून आतापर्यंत ज्यांनी कारभार पाहिला त्यांना राजकारणात पुढे फारशी प्रगती करता आलेली नाही, असा समज आहे.
त्या भीतीनेच अजित पवारांनी या कार्यालयाचा ताबा घेण्यास नकार दिला होता. त्याऐवजी सहाव्या मजल्यावरील उत्तरेकडील सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयावर दावा केला. त्यानंतर या कार्यालयाची डागडुजी हाती घेण्यात आली. तोपर्यंत अजित पवार यांना पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्यात आले होते. सहाव्या मजल्यावरील कार्यालयाचे नुतनीकरण केल्यानंतर अजित पवार यांनी सोमवारी नव्या दालनाचा ताबा घेतला.
दरम्यान, पवारांनी नव्या दालनात प्रवेश करताना आपल्या कामांचा धुमधडाका तसाच कायम ठेवल्याचे चित्र दिसून आले. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक बैठकांचे आयोजन करीत नव्या दालनातील पहिला दिवस घालविल्याचे चित्र दिसून आले.