पिंपरी (प्रतिनिधी) -इतर रुग्ण 14 दिवसांच्या उपचारांनंतर बरे होऊन घरी परतत असतानाच एका ज्येष्ठ नागरिक रुग्णाची “करोना’ पाठ सोडण्यास तयार नव्हता. अखेर डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफच्या अथक प्रयत्नांमुळे त्या रुग्णाची तब्बल 20 दिवसांनंतर “करोना’तून सुटका झाली आहे.
दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून आलेल्या एका 81 वर्षीय वृद्धाचे चौदा दिवसानंतरचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र त्यानंतरच्या सहा दिवसांत त्यांनी करोनावर मात केली आहे. 20 दिवसानंतर उपचारनंतरचे त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दिल्लीच्या तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमातून 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आले होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. चौदा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा पहिला तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनासमोर चिंता वाढली होती. त्यानंतर पुन्हा सहा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
सहा दिवसांनंतर त्यांचे घशातील द्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा चौवीस तासांनंतरचा अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची “करोना’तून मुक्तता झाल्याचे स्पष्ट झाले.