पुणे – दिवाळी सुटीत सात वर्षीय मुलीचा ताबा मिळावा, यासाठी पित्याने केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला आहे. दिवसाआड ठराविक वेळेत पित्याला मुलीला त्याच्या घरी नेण्यासाठी ताबा मिळणार आहे. दरम्यान, करोनाविषयक काळजी घेतली जावी असेही कौटुंबिक न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला.
गेली आठ महिने लहानग्यांना प्रत्यक्ष भेटू न शकलेल्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लॉकडाउनमध्ये गेल्यामुळे त्यांच्याबरोबर सुट्टीचा आनंद मिळू न शकलेल्या पालकांना प्रत्यक्ष भेटीबाबत निर्णय होऊ लागल्यामुळे दिलासा मिळाला आहे. संबंधित दाव्यात पित्याने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या सात वर्षीय मुलीचा तात्पुरता ताबा मिळावा, म्हणून कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. संबंधित मुलीच्या आईने वकिलामार्फत न्यायालयात त्याला विरोध केला. आरोग्य मंत्रालयाने लॉकडाउनमध्ये दिलेल्या आदेशात दहा वर्षाखालील मुलांच्या हालचालींबाबत काही निर्देश दिले आहेत.
त्यामुळे मुलीचा तात्पुरता ताबा देता येणार नाही, असे सांगत विरोध केला. या दाव्यात कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांनी दोन्ही बाजूचे समुपदेशन करुन मुलीच्या ताब्याचा निर्णय सामंजस्याने घ्यावा म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, दोघांचीही यात संमती झाली नाही.
त्यामुळे त्यांच्या दाव्याची सुनावणी न्यायाधीशांसमोर झाली. संबंधित मुलीचा ताबा दि. 9 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दिवसाआड ठरवून देण्यात आलेल्या वेळेत देण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला.