पुणे : राज्य सरकारने घेतलेल्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयावरून भारतीय जनता पक्षाकडून कडाडून विरोध होत असताना आता पुण्यातील चार प्रमुख शिक्षणसंस्थांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे अंतिम वर्ष परीक्षा रद्दच्या निर्णयावरून शिक्षणसंस्थांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे आणि महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजन गोऱ्हे यांनी आज पत्रकार परिषदेत अंतिम वर्षाची परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य ठरणार असल्याचे सांगितले.
राज्य शासनाने विद्यापीठ परीक्षा व्हायला पाहिजे, असा आग्रह राज्यपालांनी धरला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांचे शैक्षणिक ज्ञान ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरूंपेक्षा अधिक असल्याचा टोला लगावला. भारतीय जनता पक्षाकडून विद्यापीठ परीक्षेवरून राज्य सरकारवर टीका होत आहे. एकूणच विद्यापीठ परीक्षेचा निर्णय राजकीय होऊ पाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर चारही शिक्षणसंस्थांनी राज्य सरकारने घेतलेल्या परीक्षेच्या निर्णयावर विरोधाची मत मांडल्याने, त्याला महत्त्व प्राप्त होत आहे.