- विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाइन, ऑफलाइनचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य
- बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने परीक्षा होणारपुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षांचा पॅटर्न निश्चित केला आहे. संभाव्य वेळापत्रकही जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन किंवा ऑफलाइनद्वारे बहुपर्यायी प्रश्नांद्वारे परीक्षा घेण्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होणार असून परीक्षेच्या तयारीला लागता येणार आहे.विद्यापीठाशी संलग्नित पुणे, अहमदनगर, नाशिक या तीनही जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधून एकूण 3 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यात नियमित विद्यार्थी 2 लाख 23 हजार असून उर्वरित बॅकलॉगचे आहेत. सर्व पात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने परीक्षा द्यायची असल्यास तशी त्यांना मुभा देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीवरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन याचा विकल्प निवडण्यासाठी अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी 13 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक
ऑनलाइन व ऑफलाइन या परीक्षांचे स्वतंत्र वेळापत्रक व कार्यपद्धतीही सविस्तरपणे जाहीर करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक, मौखिक, प्रकल्प, चर्चासत्र या परीक्षा 15 ते 25 सप्टेंबर या कालावधीत गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्ट टीम, टेलिफोन, वेबीक्स या ऑनलाइन पद्धतीने घ्यावा लागणार आहेत. या परीक्षेचे संपूर्ण रेकॉर्डींग महाविद्यालयांनी ठेवणे आवश्यक आहे. या परीक्षांची अंतर्गत गुण नोंदणी विद्यापीठाच्या लिंकवर 5 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या एकेक तासांच्या बहुपर्यायी प्रश्नांद्वारेच्या परीक्षा येत्या 1 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार आहेत. सर्व अभ्यासक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा 10 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत.