पुणे(प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे “कर सहायक’ या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालात अमरावतीमधील मोहम्मद शाहीद मोहम्मद अय्युब राज्यात प्रथम आले आहेत. तर मागासवर्गीय गटातून सांगली जिल्ह्यातील मोहन पाटील, तर महिलांमध्ये नाशिक जिल्ह्यातील देवयानी निकम ह्या प्रथम आल्या आहेत.
आयोगातर्फे 6 ऑक्टोबर व 3 नोव्हेंबर 2019 रोजी “महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा’मधील कर सहायक या संवर्गातील एकूण 126 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा मुख्य निकाल आज आयोगाने जाहीर केला आहे. सविस्तर निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. खेडाळूचा दावा केलेल्या उमेदवारांनी त्यासंदर्भातील विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल नियुक्तीपूर्वी शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.
या परीक्षेत ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या तारखेपासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. परीक्षेतून कर सहायक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली.