अणुऊर्जा मंडळाकडून प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सातारा – सातारा जिल्हा रुग्णालय असुविधा आणि मनुष्यबळ यांच्यातील अंतर कमी करत चालले आहे. अणुऊर्जा नियामक महामंडळाने जिल्हा रुग्णालयाच्या सिटी स्कॅन विभागाची तांत्रिक मान्यता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे. येत्या आठवडाभरात हा विभाग सक्षमतेने चालू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन कामच करत नाही अशी अंतराळी बोंब ठोकून आपली पोळी भाजणारे बरेच दलाल येथे सक्रिय आहेत. नेत्यांची नावे सांगून प्रशासनाला दमात घेणारे गावटगेही आहेत. काही महाभाग सिव्हिल आपल्याला हुंड्यात मिळाल्याच्या अविर्भावात असतात. पण प्रत्यक्षात कामाची शिस्त स्वतःला लावून घेताना जवाबदारी टाळून तक्रार करायची ही गेल्या दहा वर्षांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. सुविधांमध्ये त्रुटी आहेत हे मान्य, मनुष्यबळ अपुरे हे मान्य, पण याचा अर्थ आम्ही कामच करत नाही असे नाही अशा प्रतिक्रिया खासगीमध्ये काही कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिल्या. येथील दलालांना हद्दपार करा अशी आर्त हाक रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
अणुऊर्जा मंडळाच्या अधिकृत मान्यतेशिवाय ही सेवा सुरू करता येत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी स्पष्ट केले. डॉ. गडीकर यांनी गेल्या दहा महिन्यात पाठपुरावा करून ज्या यंत्रणा सक्रीय केल्या त्यामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर, केमोथेरपी विभाग, मनोचिकित्सा विभाग, दंतचिकित्सा तसेच सीटी स्कॅन मशीनच्या पायाभूत सुविधांसह ती सुरू करण्यासाठी उभारलेल्या यंत्रणांचा समावेश आहे. अवघ्या सहा महिन्यात वैद्यकीय संचालनालयाकडे पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचे सिटी स्कॅन मशीन जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात स्थापित करताना किरणोत्सारिता व त्याचे धोके लक्षात घेऊन तीन वेळा आराखडा बदलण्यात आला.
सीटी स्कॅन ही यंत्रणा मानवी शरिराचे विभिन्न कोनातून क्ष किरणाच्या सहाय्याने छेद चित्र घेते. यामध्ये शरिराच्या रक्तवाहिन्या व शरिराच्या कोणत्याही भागातील बिघाड स्पष्टपणे दिसून येतो. विविध रोगांच्या अचूक उपचारासाठी ही यंत्रणा प्रभावीपणे वापरली जाते. त्यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयात ही यंत्रणा असणे आवश्यकच होते. ही यंत्रणा सक्रिय होऊनही ती स्वतंत्र कक्षात कुलूपबंद ठेवण्याची हाकाटी सुरू करत काही यंत्रणांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आग पाखड सुरू केली. मात्र तांत्रिक आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अणुऊर्जा नियामक मंडळाकडून सीटी स्कॅन यंत्रणा प्रमाणित झालेली नाही.
प्रस्ताव सादरीकरणाच्या सर्व तपशीलांवर डॉ. गडीकर यांनी स्वाक्षरी करून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. नियामक मंडळाकडून ही प्रक्रिया पूर्ण करताना कक्ष पाहणी व किरणोत्सारिता पातळी तसेच अन्य सुधारीत यंत्रणांचे अद्ययावतीकरण यासह सीटी स्कॅन कक्षाचे विलगीकरण या महत्वाच्या बाबी कटाक्षाने तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे सीटी स्कॅन यंत्रणा येत्या आठवडाभरात प्रमाणीकरणाच्या प्रमाणपत्रासह तातडीने सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी स्पष्ट केले.