लंडन – लॉर्डस मैदानाने 1983 मध्ये क्रिकेट क्षेत्रास नवा विश्वविजेता दिला होता. त्यावेळी भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवत सनसनाटी विजेतेपद मिळविले होते. आज पुन्हा येथे नवा विश्वविजेता संघ दिसणार आहे. आजपर्यंत अजिंक्यपदाच्या उंबरठ्यावरून पराभव पत्करणारे इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे. या लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#EnglandvsNewZealand: New Zealand win the toss, and opt to bat. #CWC19Final pic.twitter.com/1q4vCylZ6L
— ANI (@ANI) July 14, 2019
दरम्यान, क्रिकेटचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये विश्वविजेता होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नैपुण्याचा अभाव आहे असे नेहमी म्हटले जाते. त्यांच्यासाठी असलेला कलंक पुसण्याची संधी इऑन मॉर्गन याच्या नेतृत्वाखालील उतरलेला इंग्लंडचा संघ आज कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे.
न्यूझीलंडने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात खेळलेल्या सहा खेळाडूंचा यंदाच्या संघात समावेश आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
जरी साखळी लढतीत त्यांना इंग्लंडकडून हार मानावी लागली असली तरी भारतावरील विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या सामन्यात त्यांनी फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर समाधानकारक कामगिरी केली होती. आजही त्याच्या पुनरावृत्तीसाठी ते उत्सुक आहेत.