फिनआयक्यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धा
पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आयोजित व आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्यावहिल्या 3000 डॉलर पारितोषिक रकमेच्या फिनआयक्यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत गुजरातच्या वैदेही चौधरी व बेंगळुरूच्या सोहा सादिक यांनी अनुक्रमे तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थी व कर्नाटकाच्या प्रतिभा नारायण प्रसाद यांचा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
मेट्रोसिटी स्पोर्टस क्लब, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत अतितटीच्या झालेल्या लढतीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या गुजरातच्या वैदेही चौधरी हिने जागतिक क्रमवारीत 793व्या स्थानावर असलेल्या तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थीचा 5-7, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 3तास 15मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये साई संहिता चमर्थीने आपले वर्चस्व कायम राखले. 12व्या गेममध्ये चमर्थीने वैदेहीची सर्व्हिस ब्रेक केली व हा 7-5 असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या वैदेहीने आक्रमक खेळ करत दुसऱ्या सेटमध्ये तिसऱ्या,पाचव्या व नवव्या गेममध्ये चमर्थीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा सहज जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले.
तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये वैदेहीने सुरुवातीला जोरदार खेळ करत चमर्थीची दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. पण चमर्थीने पुनरागमन करत आपल्या बिनतोड सर्व्हिसेस व बॅकहॅंडचा सुरेख वापर करत वैदेहीची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात 4-4 अशी बरोबरी साधली. त्यानंतर वैदेहीने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत दहाव्या गेममध्ये दोन बिनतोड फटके लावत या गेममध्ये चमर्थीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4 असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. 19वर्षीय वैदेही हि अल्तेवॉल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक जिग्नेश रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत बेंगळुरूच्या सोहा सादिक हिने कडवी झुंज देत प्रतिभा नारायण प्रसादचा 6-2, 5-7, 7-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 3तास 23मिनिटे चालला. सामन्यात सोहा सादिकने प्रतिभा नारायण प्रसादविरुद्ध 6-2 असा सहज जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये प्रतिभाने आपले आव्हान कायम राखत सोहाविरुद्ध 7-5 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये 5-1 अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या सोहाने आठव्या, दहाव्या गेममध्ये प्रतिभाची सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5 असा जिंकून विजय मिळवला. 20 वर्षीय सोहा ही इलाईट टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक राजेश पठानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
सविस्तर निकाल : उपांत्य फेरी : महिला गट:
वैदेही चौधरी(भारत)वि.वि.साई संहिता चमर्थी (भारत)5-7, 6-3, 6-4;
सोहा सादिक(भारत)वि.वि.प्रतिभा नारायण प्रसाद(भारत) 6-2, 5-7, 7-5.