काश्‍मीरमध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रशासन दाखवणार चित्रपट

श्रीनगर: काश्‍मीरमधील जनतेच्या मनोरंजनासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे. त्यानुसार काश्‍मीर विभागातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाकडून मोफत चित्रपट दाखवले जाणार आहेत.

दहशतवादाची लागण झाल्यापासून काश्‍मीरमधील चित्रपटगृह बंद आहेत. दहशतवाद्यांच्या धमक्‍यांमुळे 1989 पासून तेथील चित्रपटगृहांना टाळे लागले. सध्या केवळ श्रीनगरमध्ये एक चित्रपटगृह सुरू आहे. त्यामुळे काश्‍मीरमधील चित्रपट शौकिनांना त्या मनोरंजनापासून वंचित रहावे लागत आहे. आता प्रशासनाच्या निर्णयामुळे चित्रपट शौकिनांना त्यांची आवड पूर्ण करता येणार आहे. ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

आता लवकरच त्या राज्याचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये होईल. त्या निर्णयामुळे जम्मू-काश्‍मीरच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्‍वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे. तेथील जनतेचा विश्‍वास संपादन करण्यासाठी पाऊलेही उचलली जात आहेत. आता काश्‍मीरमधील जनतेसाठी मनोरंजनाचा खजिना खुला करणे त्याचाच भाग मानला जात आहे. काश्‍मीरमध्ये सध्या लष्कराच्या वतीने जवानांसाठी काही चित्रपटगृहे चालवली जातात. चित्रपटांचे शौकिन असणारे तेथील नागरिक त्या चित्रपटगृहांची वाट धरत असतात. आता प्रशासनाकडूनच दाखवले जाणारे मोफत चित्रपट त्यांच्यासाठी मोठी पर्वणी ठरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.