फिल्म इन्स्टिट्यूटची तीन एकर जागा मिळणार : जावडेकर यांची माहिती

पुणे – “राष्ट्रीय चित्रपट ठेव्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान हा माहिती अणि प्रसारण मंत्रालयाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. केंद्र सरकारतर्फे 600 कोटी रुपयांचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी फिल्म इन्स्टिट्यूटची तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला जावडेकर यांनी रविवारी भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी जावडेकर म्हणाले, “सुमारे 1.32 लाख चित्रपट रिळांच्या स्थितीच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. कोथरुड येथील सुमारे तीन एकर जमिनीवर सरकार जतनविषयक नव्या सुविधा उभारत आहे. याशिवाय एनएफएआयमध्ये विविध गटातल्या मुलांसाठी बाल चित्रपट क्‍लबही राहील. नूतनीकरण केलेल्या जयकर बंगल्यात नवी डिजिटल लायब्ररी आणि चित्रपट संशोधकांसाठी विशेष कक्ष राहणार आहे. या लायब्ररीचे पुढील महिन्यात उद्‌घाटन करण्यात येणार आहे.’

या भेटीदरम्यान जावडेकर यांनी चित्रपट संघटनेतील मान्यवरांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत चित्रपटाची प्रत कोणत्या स्थितीत आहे, याचे मूल्यांकन, सुमारे 1 लाख 50 हजार चित्रपट रिळांचे जतन, सुमारे 3 हजार 500 चित्रपटांचे डिजिटायझेशन, भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचे स्थान मिळवलेल्या सुमारे 2 हजार चित्रपटांच्या ध्वनी मूळ स्थितीत आणणे, जतन आणि संरक्षण कप्पे निर्मिती, प्रशिक्षण आणि कार्यशाळा, समावेशक वेब आधारित माहिती तंत्रज्ञान प्रणालीनिर्मिती यांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)