रेडा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर शहराच्या विस्तारलेल्या भागाचा विकास व्हावा, म्हणून 10 कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे शहराच्या विस्तारीकरण झालेल्या भागाचा विकास होणार आहे. ज्या प्रभागाचा विकास झाला नाही तो “बॅक लॉक’ या निधीच्या माध्यमातून भरून काढण्यासाठी सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी एकत्र बसून मार्ग काढावा. शहराच्या हद्दीत असलेल्या सर्व चौकांचे सुशोभिकरणासाठी निधी वर्ग झाला आहे.त्यामुळे सर्व चौकांचे सुशोभीकरण होणार आहे, अशीही माहिती जलसंधारण सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा यांच्यासह नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.प्रदीप गारटकर म्हणाले की, इंदापूर शहराला ऐतिहासिक वारसा असल्यामुळे याठिकाणी मालोजी राजे यांची गडी ऐतिहासिक उभारण्यासाठी तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शतकोत्तर जयंती सोहळा असल्याने या ठिकाणी शिल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी राज्यमंत्री भरणे यांच्या केली.
- नगराध्यक्ष म्हणून तीन वर्षे पूर्ण केलेले आहेत. यामध्ये इंदापूरकरांनी पूर्ण सहकार्य केले आहे. भारतात 46 हजार 200 नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये देशात 10वा क्रमांक स्वच्छ व सुंदर इंदापूर शहर बनवण्यात आल्यामुळे मिळाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बक्षीसमध्ये “थ्री स्टार’ नामांकन शहराला मिळाल्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. शहरातील नागरिकांनी करोना रोगापासून बचाव करण्यासाठी मोठी खबरदारी घ्यावी, नगरपालिकेच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी व उपाय योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून द्यावा.
– अंकिता शहा, नगराध्यक्षा, इंदापूर नगरपरिषद