तर राष्ट्रवादीचे नगरसेवक आयुक्तांना देणार संरक्षण
पिंपरी – प्रभागात पाणी येत नाही म्हणून सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने कासारवाडी येथे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचा प्रकाराला 20 दिवस झाले तरी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी दबावाखाली व दहशतीखाली काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेने तर आयुक्तांनाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे गैरवर्तणूक केल्याबाबत संबंधित नगरसेविकांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी केली आहे. तर यापुढे आयुक्तांना भाजपाच्या नगरसेवकांनी दमबाजी केल्यास राष्ट्रवादीकडून संरक्षण देण्याची ग्वाहीही विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना काटे यांनी निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉग्रेसने सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा विभागास टाळे ठोकले होते. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसदस्यांवर गुन्हा दाखल केला गेला होता. आता मात्र कोणताही गुन्हा दाखल केला गेला नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दबावाखाली व दहशतीखाली काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील दोन दिवसापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेविकेने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. या घटनेनंतर आपण दोन दिवस आजारी होता, असे समजते. आपण भाजप पक्षाला सोयीस्कर अशी भूमिका घेतली. आपल्या या दुजाभावच्या वागण्यामुळे आपणांस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व ऐकरी भाषेत उल्लेख केला गेला. जेथे आयुक्तांवर ही वेळ आली आहे तर सर्वसामान्य कर्मचारी व अधिकाऱ्यांचे काय? असा प्रश्नही काटे यांनी उपस्थित केला आहे.