ई-फायलिंगमुळे वेळेची बचत : पक्षकारांना जलद न्याय मिळण्यास मदत
– विजय कुलकर्णी
पुणे – पारंपरिक पद्धतीने न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे पक्षकरांना न्याय मिळण्यास विलंब होतो. मात्र, सध्या करोनामुळे कामकजात तंत्रज्ञानाचा अधिक वापर होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. वाद मिटवण्याची पहिली पायरी असलेला दावा दाखल करण्याचे कामकाज ई-फायलिंगमुळे स्मार्ट झाले आहे.
सर्वच प्रकारच्या न्यायालयात ही सुविधा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. न्यायालयात जाणाऱ्या तक्रारीचा प्रवास हा दावा दाखल करण्यापासून सुरू होतो. त्यानंतर न्यायालयीन टप्पे पार करत ते प्रकरण निकाली लागते. या काळात विविध कारणांनी उशीर झाल्याने दाव्यास अनेक वर्ष लागतात. त्यामुळेच आता दावा दाखल करून घेण्यापासूनच अद्ययावत बाबींचा वापर करण्यात येत आहे.
न्यायालयाच्या कामकाजात होत असलेल्या आधुनिकीकरणाची नांदी म्हणून या बदलाकडे पाहिले जात आहे. जिल्हा न्यायालय, ग्राहक मंच, कामगार, औद्योगिक व सहकार न्यायालय, विविध प्रकारची प्राधिकरणे यांच्यात दरवर्षी हजारो दावे दाखल होत असतात.
दावे दाखल करताना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे न्यायालयात जातात. तेव्हापासून प्रकरण निकाली लागेपर्यंत ती कागदपत्रे न्यायालय प्रशासनाला सांभाळावी लागतात. ई-फाइलिंगमध्ये मोजक्या व डिजिटल कागदपत्रांमध्ये दावा दाखल होत असतो. संकेतस्थळावरून दावा दाखल केला जाऊ शकतो.
ई-फायलिंग प्रणालीसाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. बऱ्याचदा लाईट नसते, इंटरनेट चालत नाही. अद्याप बऱ्याच पक्षकार आणि वकिलांना ते कसे वापरायचे कळत नाही. हा बदल कायम ठेवण्यासाठी न्यायालयीन घटकांचे प्रशिक्षण झाले पाहिजे. आजही सही, शिक्का नसल्यावर कागदाला मान्यता देत नाहीत. या मानसिकतेला बदलायला वेळ लागणार आहे. मात्र, हे होणे गरचेजे आहे.
– ऍड. रोहन नहार, शिवाजीनगर आणि मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील
सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे तंत्रज्ञान ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच फायदा होईल. यामुळे काही मूठभर लोकांच्या हातातच वकिली क्षेत्र जातय काय, अशी भीती आहे. कारण, बऱ्याच वकिलांकडे या सुविधा नाहीत. अनेकजण तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले नाहीत. मात्र, हे सुरळीत होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जावा लागेल. त्यामुळे तोपर्यंत पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही पद्धती ठेवल्या पाहिजेत.
– ऍड. हेमंत झंजाड, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन