-->

करोनाचे नियम धुडकावल्याने मंगल कार्यालये, कापड दुकानावर गुन्हा दाखल

करोनाचे नियम धुडकावल्याने राजगुरूनगरमध्ये खेड पोलिसांची कारवाई

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – करोना विषाणू वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजगुरूनगर येथील दोन मंगल कार्यालय आणि एका कपड्याच्या दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.

खेड तालुक्‍यात कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने आणि जिल्हाधिकारी यांनी खबरदारीची उपाययोजना राबविण्याचे आदेश दिल्याने तालुका प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. करोनाबाबत नियमावली तयार करून कारवाई, उपाययोजनेला सुरुवात झाली आहे.

खेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाडा रस्त्यावर असलेल्या चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय आणि पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या रिद्धी सिद्दी मंगल कार्यालयामध्ये लग्नासाठी मोठी गर्दी करीत विनामास्क वऱ्हाडी आढळल्याने मंगल कार्यालय मालक आणि लग्न कार्य मालकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजगुरूनगर शहरात असलेल्या हापीज या कपड्याच्या दुकानापुढे सेल लावून गर्दी जमविल्या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

खेड तालुक्‍यात जादा संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने पुणे जिल्हाधिकारी यांच्याआदेशाने प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सर्व अधिकाऱ्यांना करावयाच्या उपाययोजना आणि निर्बंध जारी करण्याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, राजगुरुनगर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटिल, आळंदी मुख्याधिकारी अंकुश जाधव, चाकण मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव आदिंसह विविध विभाग प्रमुख आणि चाकण, आळंदी, म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे अधिकारी, एस. टी महामंडळाचे आगार व्यवस्थापक रमेश हांडे, बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.

लग्न समारंभासह इतर कार्यक्रमात मास्क वापरणे व परस्परांध्ये अंतर ठेवणे बंधनकारक केले आहे. नियमांचे उल्लंघन करणारे वधूवर मंडळी तसेच कार्यालय मालक यांचेवर जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील अशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एकूणच करोना रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज ठेवण्याबरोबरच शाळा पातळीवर शिक्षकांना अर्लट राहाण्याबाबत सूचना देण्यात आली आहेत.

संस्थांच्या सभा रद्द कराव्या लागणार?

खेड तालुक्‍यातील रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्व उपाययोजना करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सहकार क्षेत्रात निवडणुकांचे पडघम वाजत असताना सहकारी बॅंका, पतसंस्था, सोसायटी आदिंना रखडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभांच्या तारखा जाहिर केल्या होत्या; मात्र 50 लोकांच्या मर्यादा आल्याने कोरम अभावी या वार्षिक सभा आता रद्द करण्याची नामुष्की येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.