पुणे – शासकीय वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) गटनेते वसंत मोरे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीला अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मोरे यांनी सोमवारी पालिकेचे कार्यकारी अभियंता नितीन उदास यांच्या शासकीय वाहनाच्या काचा फोडल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक (गुन्हे) मनीषा झेंडे यांनी फिर्याद दिली होती.
रुग्णांना रुग्णालयांत घेऊन जाण्यासाठी तसेच एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करायला नेण्यासाठी सध्या लवकर रुग्णवाहिका मिळत नाही. याच प्रकारामुळे चिडून जाऊन प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करीत मोरे यांनी ही तोडफोड केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्यांच्यावतीने ऍड. गणेश म्हस्के आणि ऍड. सतीश कांबळे यांनी युक्तिवाद करीत जामीन देण्याची मागणी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी त्यांना जामीन मंजूर केला.