पुणे – महापालिकेच्या गाडीखाना येथील दवाखान्यात एका आरोग्य कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी संबंधीत कार्यालयातीलच त्याच्या सहकाऱ्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 मार्च रोजी सकाळी घडला होता. मृत्यूपूर्व चिठ्ठीतील जबाबानंतर आत्मत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
विजयानंद तांदळे (रा. किरकटवाडी) असे आत्महत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा यश तांदळे (24, रा. किरकटवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी धनंजय नानासाहेब घुले (रा. फुरसुंगी) याच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विजयानंद तांदळे आणि संशयीत आरोपी धनंजय घुले हे दोघेही मित्र असून गाडीखाना येथील आरोग्य केंद्रात ते कामाला होते. तेथे कामाला असताना दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार झाले होते.
घुले याने तांदळे यांच्याकडून 15 लाख रूपये धनादेशाद्वारे घेतले होते. परंतु, घुले याने त्याला माहित नसलेल्या व्यक्तीशी तांदळे यांचे संबंध जोडून त्यांची समाजात बदनामी केली. यामुळे तांदळे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून 24 मार्च रोजी गाडीखाना येथील कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.