मुंबई : उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळून आलेल्या कारचा तपास हाती घेणाऱ्या एनआयएनं मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासदेखील स्वत:कडे घेण्याची तयारी सुरू केली आहे. सचिन वाझे प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत आहे. त्यामुळे विरोधक सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आता मनसूख हिरेन आत्महत्या केस देखील एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे.
मनसूख हिरेन प्रकरणाच्या चौकशीसाठी आवश्यक परवानग्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घेण्याचं काम सुरू झाल्याचं वृत्त एका वाहिनीने दिलं आहे. त्यामुळे मनसूख हिरेन प्रकरणाची फाईल आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेल्याचं बोललं जात असून यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
वास्तविक पाहता एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसूख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची तयारी एनआयएनं सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यास एनआयएला ठाकरे सरकारची सरकारची परावनगी घ्यावी लागणार नाही.