बारामती (प्रतिनिधी)- पुणे विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांकडून खुल्या व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शासनाने निर्धारित केलेल्या फी पेक्षा जादा फि घेणाऱ्या महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सामाजिक न्याय विभागाकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
राज्यात एकाबाजूला कोरोनामुळे सर्वच गोष्टी बंद असताना अनेक महाविद्यायांच्या इमारती, तेथील वसतिगृहे रूग्णांवरील उपचारांसाठी सरकारनेच ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होतील याची कोणतीही शाश्वती नसताना पुणे विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांनी मात्र फि वसूली करण्यास सुरुवात केली, असून खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून निर्धारीत केलेल्या फि पेक्षा वाढीव फि महाविद्यालयांनी वसुल करण्यास सुरु केल्याने या अशा महाविद्यालयांवर सामाजिक न्याय विभागाने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, विभागाच्या सचिवांकडे केली.
शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अश्या सर्वच क्षेत्रातील कामे ठप्प झाली आहेत. त्यातून शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची तर फारच गैरसोय होत आहे. कोविड मध्ये शाळा- महाविद्यालयांचे कोविड केंद्रात रूपांतर, रखडलेल्या परीक्षा, अर्धवट झालेले अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे निकाल, या सर्वच विषयांवर भ्रम पसरलेला आहे. त्यातून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी च अनेक शाळा- महाविद्यालयांनी फी आकारण्यास सुरवात केली आहे.
पुणे विद्यापीठाने २०११ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळणे गरजेचे आहे. परंतु अनेक महाविद्यालयानी सन २००८-o९ ते आजपर्यंत खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून वाढीव फी आकारली आहे. मुळात सवलत मिळण्याचा हक्क असताना देखील ते भरमसाठ फी भरत आहेत. या गंभीर विषयाकडे लक्ष देता, पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे ऑडिट करून खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून घेण्यात आलेले वाढीव शुल्क त्वरित त्यांना परत करावे व संबंधित महाविद्यालयावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.
या मागणीचे निवेदन मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव तसेच आयुक्त समाजकल्याण पुणे यांना मेलद्वारे पाठवले आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास मनसेच्या वतीने विविध विद्यार्थी संघटना व विद्यार्थी मार्फत विद्यापीठांतून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बारामतीचे मन मनसेचे अध्यक्ष अॅड निलेश वाबळे व सामाजिक कार्यकर्ता अमर एकाड यांनी दिला आहे.