प्रत्येक गुन्ह्यांसाठी स्वतंत्र याचिका दाखल करा ;मुंबई हायकोर्टाची नारायण राणे यांना सूचना

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबंधात आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाराष्ट्रात सहा विविध ठिकाणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे रद्द करावेत अशी मागणी करणारी एक याचिका नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. तथापी एकाच याचिकेत सर्व गुन्हे रद्द करावेत अशी मागणी राणे यांना करता येणार नाही, त्यांनी प्रत्येक गुन्ह्याच्या संबंधात स्वतंत्र याचिका दाखल करावी अशी सूचना हायकोर्टाने राणे यांना केली आहे.

राणे यांच्या विरोधात महाड, नाशिक, पुणे, ठाणे, जळगाव आणि अहमदनगर आदि ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहा गुन्ह्यांच्या संबंधात स्वतंत्र याचिका दाखल केल्यास सरकारलाही संबंधीत पोलिस ठाण्यांकडून स्वतंत्र अहवाल मागवून घेणे सोपे होईल त्यामुळे कामकाजाच्या सोयीसाठी त्यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या पाहिजेत अशी सूचना हायकोर्टाने राणेंच्या वकिलांना केली.

त्यानुसार राणे यांच्या वकिलांनी ही सूचना मान्य करून स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे मान्य केले आहे. तथापि या सहाही गुन्ह्यांच्या अनुषंगाने आपल्या अशिलाला न्यायालयाकडून कोणत्याही कारवाईच्या संबंधात संरक्षण मिळावे अशी मागणी राणेंच्या वकिलांनी केली. त्यावर कोर्टाने त्यांना प्रथम त्यावर सुनावणी घेऊ आणि त्या विषयी नंतर निर्णय देऊ असे स्पष्ट केले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 सप्टेंबरला होणार आहे. राणे यांना नाशिक मधील गुन्ह्याच्या संबंधात 25 सप्टेंबर रोजी तेथील पोलिसांपुढे उभे राहायचे आहे. त्याला राणेंनी सहमती दर्शवली आहे. ते सहकार्य करतील अशी अपेक्षा सरकारी पक्षाने व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.